
सामना प्रतिनिधी । मुंबई
वैद्यकीय शिक्षणासह विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱया सीईटी, नीट परीक्षांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. मुंबईच्या फोर्ट भागात राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आणि प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालय स्थलांतरित करण्यात आले. या कार्यालयात हा कक्ष उभारण्यात येणार असून या कार्यालयाची आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पाहणी केली.
तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, उच्च शिक्षण, आयुष, कला, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय या अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि पालकांसाठी देखील स्वतंत्र मदतकक्ष तयार करण्यात आला आहे. यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी, शाळा सोडल्याचे दाखले आदींची माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सोयीसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क सीईटी कक्षात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
-तंत्रशिक्षण – ०२२-२२६५२२६१/६२, ८१०४६४३२९३/९६६५९७५६०९
-वैद्यकीय शिक्षण -९७६९१९९४२१/७७३८७८१७४३
-उच्च शिक्षण – ०२२-२६४७३७१९, ०२०-२६०५१७२९
-संकेतस्थळ – www.mahacet.org/www.spnsamitied.goved.in





























































