आता आव्हान रोगराई हटवण्याचे, घरे स्वच्छ करण्याचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कोल्हापूर, सांगली, कराडमध्ये आता महापूर ओसरू लागला आहे. आता दिसत आहे तो फक्त चिखल, मेलेली जनावरे. जिकडे तिकडे प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे आव्हान आहे ते रोगराई हटवण्याचे आणि घरेदारे स्वच्छ करण्याचे. गावेच्या गावे साफ करण्याचे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्थांचे तब्बल 2 हजार स्वयंसेवक याठिकाणी काम करत आहेत. त्यांना सर्वात आधी घरे, मंदिरे, शाळा आणि चौक, रस्ते पाण्याने स्वच्छ धुवून काढावे लागणार आहेत. त्यानंतर जंतूनाशक रसायने टाकावी लागणार आहेत.

2005 मध्ये आलेल्या महापूरात पाणीपातळी 50 फूट होती. परंतु, यावेळी ही पाणीपातळी 55 फुटांच्याही पुढे गेली. धरणक्षेत्रात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे ही पाणीपातळी मोठया प्रमाणावर वाढली. परिणामी लोकांना घरेदारे आहेत त्या अवस्थेत सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. बावनठामे, बापटकॅम्प, कुंभारगल्ली या सर्वच ठिकाणी पाणी पाच ते सहा फुटांनी वाढले. आता स्वयंसेवकांना याठिकाणी काम करण्यासाठी 10 हून अधिक दिवस लागतील अशी माहिती समाजिक कार्यकर्ते सतिश कुलकर्णी यांनी दिली. त्यांना गमबूट, हॅण्डग्लोव्हज, खराटे, झाडू द्यावे लागणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

प्रभावी जंतुनाशके फवारण्याची गरज
दुर्गंधी जावी यासाठी जंतुनाशके तर फवारावी लागणारच आहेत. पंरतु, आता मोठय़ा प्रमाणावर छोटय़ामोठय़ा कीडय़ांचा किंवा कृमींचाही त्रास सुरू होणार आहे. त्यादृष्टीने जंतुनाशक औषधांची फवारणी करावी लागणार आहे. सध्या सिव्हील सर्जन, डॉक्टरांच्या पथकाने आरोग्य तपासणी शिबीरे राबवायला सुरुवात केली आहे. व्हॅक्सिनेशन करायला सुरुवात केली आहे. मात्र, आता योग्य प्रकारे जंतुनाशक फवारणी तसेच लोकांवर योग्य उपचार करण्याची गरज असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.