
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इंजिनीयरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जेईई मेन्स आणि नीट या दोन्ही परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार आहेत. या दोन्ही परीक्षांसह यापुढे देशपातळीवर होणाऱया सर्व प्रवेश परीक्षांचे आयोजन सीबीएसईऐवजी आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) करणार आहे.
नवी दिल्ली येथील शास्त्राr भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘एनटीए’ ची स्थापना केल्याची घोषणा केली. एनटीएमार्फत आयोजित होणारी पहिली परीक्षा यूजीसी नॅशनल एलिजिबीलिटी टेस्ट (एनईटी) येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. एनईटी, जेईई मेन्स आणि नीट या परीक्षांबरोबरच एनटीए कॉमन मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट (सीमॅट) आणि ग्रॅज्युएट फार्मसी ऑटिटय़ूड टेस्ट (जीपीएटी)चे आयोजनही करणार आहे.
– इंजिनीयरिंग आणि मेडिकल प्रवेशासाठी जेईई मेन्स आणि नीट या महत्त्वाच्या परीक्षा असतात. पूर्वी वर्षातून फक्त एकदाच या परीक्षा व्हायच्या. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसता आले नाही किंवा कमी गुण मिळाले तर पूर्ण वर्ष वाया जायचे.
– अखेर या परीक्षांचे धोरण बदलण्यात आले. या दोन्ही परीक्षा आता वर्षातून दोन वेळेला घेतल्या जातील. विद्यार्थी एकदा किंवा दोन्ही वेळेला परीक्षा देऊ शकतात. यांपैकी सर्वाधिक गुण ज्या परीक्षेत मिळतील ते गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील.
– विशेष म्हणजे जेईई आणि नीट परीक्षा ऑनलाईन संगणकावर द्यायची आहे. परीक्षेसाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी ठरविण्यात आला असून परीक्षेची दिवस, वेळ विद्यार्थ्यांनीच ठरवायची आहे.
ऑगस्टपासून परीक्षांचा ऑनलाइन सराव
जेईई मेन्स आणि नीट या दोन्ही परीक्षा आता स्टुडंट फ्रेण्डली झाल्या आहेत. या परीक्षा ऑनलाइन असल्याने पेपरलीकचे प्रमाण शून्य आहे. या परीक्षांचा विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी ऑगस्ट अखेरपासून एनटीएची सेंटर सुरू होणार आहेत. लवकरच एनटीएमार्फत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वेबसाइटवर परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध होईल. – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री
अभ्यासक्रम, परीक्षा शुल्कात बदल नाही
जेईई मेन्स, नीटसह अन्य परीक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, परीक्षेचे माध्यम आणि परीक्षा शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच देशभरातील आयआयटी प्रवेशपरीक्षा घेऊन पूर्वीप्रमाणेच प्रवेशप्रक्रिया राबवू शकतात, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
परीक्षांचे असे असेल वेळापत्रक
– या वर्षी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱया परीक्षेचे अपेक्षित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
– यूजीसी-नेट ही परीक्षा दि. २ आणि दि. १६ डिसेंबर २०१८ ला दोन सत्रांत होणे अपेक्षित आहे. या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याचा कालावधी हा १ ते ३० सप्टेंबर २०१८ असणार आहे. या परीक्षेचा निकाल जानेवारी २०१९ च्या शेवटच्या आठवडय़ात लागू शकेल.
– जेईईच्या मुख्य परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाइन अर्ज १ ते ३० सप्टेंबर २०१८ दरम्यान भरता येणार असून ही परीक्षा ६ ते २० जानेवारी २०१९ च्या दरम्यान ८ वेळा होणार असून उमेदवार कोणत्याही एका तारखेला परीक्षेस बसू शकतील. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या आठवडय़ात लागू शकेल.
– जेईईची मुख्य परीक्षा दुसऱयांदा ७ ते २१ एप्रिल २०१९ दरम्यान ८ वेळा होणार असून उमेदवार या परीक्षेलाही कोणत्याही एका तारखेला बसू शकतील. या परीक्षेला बसण्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱया आठवडय़ात ऑनलाइन अर्ज भरता येतील. या परीक्षेचा निकाल मे २०१९ च्या पहिल्या आठवडय़ात लागू शकेल.
– राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा ही पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मे २०१९ मध्ये होणार आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये होणाऱया परीक्षेसाठी १ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. ३ ते १७ फेब्रुवारी २०१९ च्या दरम्यान ८ वेळा होणार असून विद्यार्थी कोणत्याही एका तारखेला परीक्षा देऊ शकतील. या परीक्षेचा निकाल मार्चच्या २०१९ मध्ये लागू शकेल.
– राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा दुसऱयांदा १२ ते २६ मे २०१९ दरम्यान होणार असून यासाठी मार्च २०१९ च्या दुसऱया आठवडय़ात ऑनलाइन अर्ज भरता येणार. या परीक्षेचा निकाल जून २०१९ च्या पहिल्या आठवडय़ात लागणे अपेक्षित आहे.
– सीमॅट आणि जीपॅट ही परीक्षा जानेवारी २०१९ मध्ये होणे अपेक्षित असून दिनांक २२ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येऊ शकतील. या परीक्षा दिनांक २७ जानेवारी २०१९ ला होऊ शकतात तर या परीक्षांचे निकाल फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या आठवडय़ात लागणे अपेक्षित आहेत.
























































