
हिंदुस्थानी राष्ट्रीय रायफल्स असोसिएशनने (एनआरएआय) गुरुवारी 24 ज्युनियर आणि सीनियर नेमबाजी प्रशिक्षकांशी केलेले करार तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय या प्रशिक्षकांना ई-मेलने कळवण्यात आला आहे. एनआरएआयने टोकियो ऑलिम्पिकनंतर स्मिरनॉव्ह पावेल (पिस्तूल) आणि ओलेग मिखालोव्ह (रायफल) या परदेशी नेमबाजी प्रशिक्षकांचे करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. टोकियो ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानी नेमबाजांच्या फ्लॉप शोनंतर राष्ट्रीय नेमबाजी महासंघाने हिंदुस्थानी प्रशिक्षकांवर या अपयशाचे खापर फोडत त्यांना पुन्हा प्रशिक्षकपदी न ठेवण्याचे ठरवले होते. ‘एनआरएआय’ने अखेर सर्व प्रशिक्षकांची फेरनिरीक्षण बैठक घेत आपला नवा निर्णय निश्चित केल्याचे समजते.

























































