
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा रविवार 8 सप्टेंबर रोजी आसाम दौर्यावर जाणार आहेत. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)ची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शहा यांचा हा पहिलाच आसाम दौरा आहे. तसेच अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर इशान्य हिंदुस्थानचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे.
एनआरसी यादीत नावे नसल्याने आसाममधील अनेक लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. एनआरसी यादीत जवळपास 19 लाख लोकांची नावे नाही आहेत. दरम्यान, आज गृहमंत्री अमित शहा गुवाहाटी येथे इशान्य परिषदेच्या (एनआरसी) बैठकीत उपस्थित राहतील. या दौऱ्यात ते आठ राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. एनआरसी यादी जाहीर झाल्यानंतर आसामचे अर्थमंत्री हिमंता बिस्वा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रणजितकुमार दास यांनी या यादीत असंख्य हिंदुस्थानी असलेल्या नागरिकांची नावे समाविष्ट नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मूळचे हिंदुस्थानी असलेल्या नागरिकांच्या अधिकारांसाठी सरकार नक्की काही तरी पर्याय काढणार, अशी शक्यता बिस्वा आणि दास व्यक्त केली आहे.
याआधी अमित शाह 3 आणि 4 ऑगस्ट रोजी एनआरसीच्या बैठकीत सहभागी होणार होते. परंतु ही बैठक तहकूब करण्यात आली. 5 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा प्रदान करणारे कलम 370 रद्द केले, या दरम्यान व्यस्ततेमुळे शहा यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.





























































