एनटीपीसीचे मिशन सौर ऊर्जा!  बारा वर्षात 30 हजार मेगा वॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पनांतर आता नॅशनल थर्मल पॉवर कार्पेरेशनने (एनटीपीसी) मिशन सौर ऊर्जा मोहीम हाती घेतली आहे. भविष्यातील विजेची वाढती मागणी आणि सौर ऊर्जेचे महत्व ओळखून पुढील 12 वर्षात म्हणजे 2032 पर्यंत तब्बल 30 हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीची नोंदणी केली आहे.

सध्या एनटीपीसीची एकूण वीज निर्मिती क्षमता 62 हजार मेगावॅटच्या घरात आहे. त्यामध्ये 90 टक्क्यांहून अधिक औष्णिक वीज प्रकल्पांचा समावेश आहे. तर उर्वरित विद्युत आणि जलविद्युत प्रकल्प आहेत. औष्णिक प्रकल्पाच्या तुलनेत तयार होणारी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातील वीज स्वस्त आहे. त्यातच केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभागाने 2022 पर्यंत अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता एक लाख 75 हजार मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापार्श्वभूमीवर एनटीपीसीनेही सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी स्वतंत्र उपकंपनीची स्थापना केली आहे. पहिल्या टप्प्यात 50 हजार कोटी रुपये खर्चून 2022 पर्यंत दहा हजार मेगावॅट क्षमतेचे देशभर सौर प्रकल्प उभारले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.