
देशासह राज्यात आज कोरोना रुग्णांची संख्या घटली असून देशात 9 हजार 111 तर राज्यात 505 रुग्ण सापडले. देशात गेल्या 24 तासांत 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात राज्यातील दोघा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात 131 रुग्ण सापडले तर एकही मृत्यू झाला नाही.
देशात कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर कमी झालेली कोरोनाची रुग्णसंख्या जानेवारीपासून वाढू लागली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून यात मोठी वाढ होत असून सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. देशात गुरुवारी 11 हजार रुग्ण सापडले होते, मात्र गेल्या काही दिवसांत ही रुग्णसंख्या कमी झाली असून आज देशात दिवसभरात 9 हजार 111 रुग्ण सापडले.
धोका कायम; सक्रिय रुग्णांची संख्या 60 हजारांच्या पार
देशात गेल्या तीन-चार दिवसांत रुग्णसंख्या घटली असली तर सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून ही संख्या 60 हजार 313 वर पोहोचली आहे. गेल्या आठवडय़ात ही संख्या 57 हजारांवर होती, मात्र त्यात वाढ झाली आहे. कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढले असून 5.30 टक्क्यांवर असलेले हे प्रमाण वाढून 8.40 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीचा धोका कायम आहे.
राज्यात आतापर्यंत 62 मृत्यू
राज्यात 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 73 टक्के रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक, 58 टक्के हे विविध प्रदीर्घ आजार असलेले, 10 टक्के हे आजार नसलेले तर 32 टक्के रुग्णांची माहिती अद्याप मिळालेली नाही, असे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. दरम्यान, राज्यात एक्सबीबीचे 681 रुग्ण असून त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 87 वर पोहोचली आहे तर मुंबईत ही संख्या 1 हजार 699 वर पोहोचली आहे.
























































