
नगर जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीप्रकरणी दोषी ठरवत परिचारिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याच्या निषेधार्थ सेंट जॉर्ज रुग्णालयातील परिचारिकांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. त्या परिचारिकांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या, अन्यथा बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
नगरच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 6 नोव्हेंबरला आग लागली होती. या आगीमुळे 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहा अधिकारी आणि कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी एका परिचारिकेवर निलंबनाची तर दोन परिचारिकांवर सेवासमाप्तीची कारवाई केली आहे. शासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील परिचारिका काळ्या फिती लावून रुग्णसेवा करीत आहेत. परिचारिकांवरील निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सेंट जॉर्ज रुग्णालय युनिटच्या सेक्रेटरी समीधा गोरे यांनी दिली.




























































