ओबीसी विद्यार्थ्यांना हवी सरसकट फेलोशिप, आझाद मैदानात उपोषण सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाज्योतीच्या माध्यमातून देण्यात येणाऱया ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (एमजेपीआरएफ) गेल्या वर्षीपर्यंत अर्ज केलेल्या सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट उपलब्ध झाली होती. तीच परंपरा कायम ठेवत या वर्षीदेखील विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप उपलब्ध करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांना सरकार उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आखीत असून मागील वर्षी 1238 लोकांना फेलोशिप देण्यात आली आणि या वर्षी सुरुवातीला मात्र 50 आणि आता 200 जागा हा तुटपुंजा न्याय देऊन हजाराहून अधिक लोकांना फेलोशिपचा हक्क नाकारण्यात आला आहे. त्यामुळे सरकारजवळ आपले म्हणणे मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणासाठी महाराष्ट्रभरातून संशोधक विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. संदीप आखाडे, सद्दाम मुजावर, अविनाश गुरव, ठकू पुजारी, विष्णू गोरे, सुदर्शन लोहार, जनार्दन येडगे, जितेंद्र पेंढारकर, आयेशा अत्तार, अतुल पाटील, गणेश माळी, रोहित पारिट, तनुजा पंडित उपस्थित होते.

पीएचडीसाठी नोंदणी झालेल्या दिनांकापासून फेलोशिप अदा करण्यात यावी, अशी मागणीदेखील ओबीसी, विमुक्त जाती – भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग समुदायातील संशोधक-पालक, महाज्योती कृती समितीच्या वतीने सद्दाम मुजावर, विद्यार्थी संघ, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.