विद्यापीठाच्या दिरंगाईमुळेच 38 इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र रखडले; शिवसेनेचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच कलिना कॅम्पसमधील तब्बल 38 इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या इमारती वापराविना पडून असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. भोगवटा प्रमाणपत्र आणि अग्निशमन दलाच्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱया अटीशर्ती पूर्ण केल्या नसल्यामुळेच या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसल्याचेही शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या नव्या परीक्षा भवनासह तब्बल 38 इमारती गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही वापराविना पडून आहेत. निवासी प्रमाणपत्र नसल्याने या इमारती वापराविना पडून असल्याचे आमदार संजय पोतनीस यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यापीठानेच सांगितले होते. भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना अद्याप कार्यवाही का झाली नाही? असा सवालही पोतनीस यांनी केला.

पालिकेत पुढच्या आठवडय़ात बैठक

मुंबई विद्यापीठाच्या नव्या इमारती वापराविना पडून असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परीक्षा भवनाची इमारतही जुनी असल्याने धोका संभवतो. त्यामुळे या 38 इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पालिकेत पुढील आठवडय़ात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार असल्याचे युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याबाबतची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर  कोणत्याही संस्थेने अर्ज केल्यानंतर अग्निशमन दलाकडून रीतसर तपासणी करण्यात येते. अटींची पूर्तता केलेली असल्यास भोगवटा प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे अग्निशमन दलाचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र दिले जाते. अशा अटीशर्ती पूर्ण केल्यास या 38 इमारतींनाही तातडीने ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्यात येईल.
– हेमंत परब, प्रमुख अग्निशमन दल अधिकारी