
मुलींची छेड काढल्याचा आरोप करून दिवसाढवळय़ा एका ‘जनरल रेल्वे पोलीस’ (जीआरपी) कॉन्स्टेबलची संतप्त जमावाने निर्दयीपणे मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना भाजपशासित ओडिशामध्ये घडली. या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सौम्य रंजन हे गेल्या 12 वर्षांपासून कटक येथे तैनात आहेत. त्यांना निलंबित करण्यात आले होते. ते कार्यालयीन ओम प्रकाश नावाच्या सहकाऱयासह कामाच्या निमित्ताने रेल्वेचे अतिरिक्त महासंचालक यांना भेटण्यासाठी जात होते. वाटेत दोन मुलींवर अश्लील शेरेबाजी केली तसेच त्यांच्या मोटरसायकलने दोन महिलांनाही धडक दिल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच मोठा जमाव रस्त्यावर गोळा झाला. लोकांनी सौम्य रंजन आणि ओम प्रकाश यांना रोखले. काही वेळातच संतप्त जमावाने सौम्य रंजन यांच्यावर हल्ला केला. त्यांना लाथा आणि बुक्क्याने बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर, त्यांचे दोन्ही हात आणि पाय बांधून एका काठीला उलटे लटकवून धिंड काढण्यात आली. काठीला बांधलेले असताना अनेकांनी सौम्य रंजन यांना लाथांनी मारहाण केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



























































