
बालासोर रेल्वे अपघातात मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले आहेत. त्यामुळे 200 मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरूच आहे.
ओडिशातील बाहानगर बाजार स्टेशन येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन एक्सप्रेस आणि एका मालगाडीचा भयंकर अपघात झाला. अपघातात किमान 288 प्रवासी मृत्युमुखी पडले आणि 1100 वर जखमी झाले. शतकातील सर्वांत भीषण रेल्वे अपघात असे याचे वर्णन करण्यात येते.
मृतांची संख्या नेमकी किती?
रेल्वे बोर्डाने 288 मृत्युमुखी आणि 1000 जखमी असे म्हटले आहे, मात्र आज ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी मृतांची संख्या 275 आणि 1175 जखमी, असे सांगितले. मृतदेह मोजताना चूक झाली. काही मृतदेह डबल मोजले गेले, असे ते म्हणाले.
कसा झाला अपघात?
जया वर्मा सिन्हा यांनी आज अपघाताचा घटनाक्रम दिला आहे. सिग्नल यंत्रणेत काहीतरी गडबड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बाहानगर बाजार रेल्वे स्टेशनवर चार लाईन्स (रेल्वेमार्ग) आहेत. यापैकी मधल्या दोन लाईन्सवर कोणत्याही रेल्वे थांबत नाहीत. स्थानकावर न थांबता पुढे जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेंसाठी या लाईन्स आहेत, तर इतर दोन लाईन्स या लूप लाईन्स आहेत.
अपघात झाला तेव्हा दोन्ही लूप लाईन्सवर दोन गाडय़ा आधीपासून उभ्या होत्या. त्यात एका लूप लाईनवर मालगाडी होती. मधल्या दोन लाईन्स मेल-एक्सप्रेस गाडय़ांसाठी उपलब्ध होत्या.
यावेळी बंगळुरूहून हावडाकडे जाणारी यशवंतपूर एक्सप्रेस आणि दुसऱ्या बाजूने पश्चिम बंगाल येथील शालिमारहून चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस येत होती. दोन रेल्वेसाठी दोन लाईन मोकळय़ा होत्या. दोन्ही लाईन्सवर डायरेक्शन, रूट आणि संलग्न यंत्रणा सेट होती. दोन्ही रेल्वेसाठी ग्रीन सिग्नल होते.
कोरोमंडल एक्सप्रेससाठी 130 किमी प्रतितास ही वेगमर्यादा निश्चित आहे. ही रेल्वे 128 किमी प्रतितास वेगाने धावत होती. दुसऱ्या बाजूने यशवंतपूर एक्सप्रेसचा वेग 126 किमी प्रतितास इतका होता.
सिग्नलमध्ये काहीतरी त्रुटी झाली आणि कोरोमंडल एक्सप्रेस लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीवर धडकली. कोरोमंडल एक्सप्रेसचे इंजिन मालगाडीवर चढले आणि मागे डबे घसरले. त्यावेळी काही मिनिटांत यशवंपूर एक्सप्रेस आली, मात्र कोरोमंडलचे डबे लाईनवर पडल्यामुळे त्यावर धडकली. यामुळे यशवंतपूर एक्सप्रेसचेही दोन डबे घसरले. यामुळे मृतांची संख्या वाढली.


























































