
शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा वापर करून फडके प्रकाशनने शिवाजी विद्यापीठाच्या बीए भाग 1, 2 आणि 3 अशा पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मराठय़ांचा इतिहास असे लिहून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर देसाई व लिमये या टोपण नावाने सुपर गाईड प्रकाशित केले आहे. चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगणाऱया या लेखकांवर आणि प्रकाशकावर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेत शेकापचे जयंत पाटील यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केली. दरम्यान, याची गंभीर दखल घेत चौकशी करून आक्षेपार्ह मजकूर दूर केला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा उल्लेख क्रूरवध असे वादग्रस्त विधानाचे लिखाण केले आहे. शिवाय छत्रपती संभाजी महाराजांनी मराठय़ांचे राज्य गमावले, असेही चुकीचा उल्लेख यात केला आहे तर महाराणी ताराबाई यांच्याबद्दलही पुस्तकात अनेक ठिकाणी एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत सरकारने तातडीने चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱया लेखकांवर आणि प्रकाशकावर कारवाई करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
























































