
प्रख्यात तबलावादक ओजस अधिया यांना नुकताच ‘युथ आयकॉन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कला क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी ‘भारतीय युवा मंच’ प्रायोजित आणि ‘पूर्ववाद युवा फोरम व प्राणकन्या प्रतिष्ठान’तर्फे त्यांना हा पुरस्कार दिला आहे.
ओजस यांनी संगीताच्या क्षेत्रात बालकलाकार म्हणून आपली कीर्ती प्रस्थापित केली. प्रख्यात संगीत दिग्दर्शक पद्मश्री कल्याणजी यांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखली. त्यानंतर त्यांची रवानगी कल्याणजी-आनंदजी यांच्या संस्थेत झाली. वयाच्या पाचव्या वर्षी मृदंगराज यांच्याकडे त्यांनी तबल्याचे धडे गिरवले. तबल्यावर साथसंगत करण्याचे प्रशिक्षण त्यांना तेथे मिळाले. प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून ओजस यांना खूप शिकायला मिळाले तसेच त्यांच्याबरोबर तबला वाजवण्याची संधी मिळाली. आजवर ओजस यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, कलावीर अकादमीचे प्रमाणपत्र, पंडित व्ही.डी. पलुस्कर पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा बिस्मिल्ला खान पुरस्कार यांचा समावेश आहे.






























































