महानिर्मितीचे जुने वीज प्रकल्प होणार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महानिर्मितीचे राज्यातील वय झालेले सुमारे अडीच हजार मेगावॅट क्षमतेचे औष्णिक वीज संच आता बंद होणार आहेत. 35 वर्षांपेक्षा जास्त वय झालेल्या 12 वीज संचामधून आजही वीजनिर्मिती सुरू असल्याने मोठय़ा प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यावर मर्यादा येत असल्याचे  वृत्त नुकतेच दैनिक ‘सामना’मध्ये प्रकाशित झाले होते. त्याची महानिर्मितीने दखल घेत जुने सर्वच वीज संच पुढील तीन-चार वर्षांत टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

महानिर्मितीची एकूण वीजनिर्मिती क्षमता जवळपास साडेतेरा हजार मेगावॅटच्या घरात असून कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पांची क्षमता 11 हजार मेगावॅट एवढी आहे. त्यामध्ये 1980-90 च्या दरम्यान उभारलेल्या 12 वीज संचांचा समावेश असून त्यांची प्रत्येकी 210 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती क्षमता आहे. त्यातून हवेचे प्रदूषण आणि जुन्या वीज प्रकल्पामुळे वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व जुने प्रकल्प बंद करण्यात येणार आहेत. दरम्यान, भुसावळ येथील 660 मेगावॅट आणि कोराडी येथील 1320 मेगावॅटचे वीज संच सुरू झाल्यानंतर टप्प्याने जुने संच बंद होणार आहेत.