पुण्यात साकारणार ऑलिम्पिक भवनासह संग्रहालय!

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ऑलिम्पिक भवन व ऑलिम्पिक म्युझियम साकारले जाणार आहे. अडीच एकर जागेत साकारणाऱया या भवनासाठी 72.78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आज त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात येणाऱया ऑलिम्पिक भवनात क्रीडा संचालनालयाचे कार्यालय, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेशी संलग्न राज्य संघटनांची कार्यालये, सभागृह बांधण्यात येणार आहेत. भवनाच्या तळमजल्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संग्रहालय उभे राहणार आहे. तब्बल 14 वर्षांच्या अडथळ्यांनंतर ऑलिम्पिक भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यामुळे क्रीडापटू आणि संघटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 2010 पासून ऑलिम्पिक भवनाचा प्रकल्प सुरू झाला होता, ज्याचा भूमिपूजन सोहळा आता करण्यात आला. या भवनाच्या उभारणीमुळे राज्यातील क्रीडा संघटना व शासनामधील विकास योजनांना गती प्राप्त होईल, असा विश्वास संघटकांनी व्यक्त केला.

राज्यात ऑलिम्पिक पदक विजेते निर्माण व्हावेत म्हणून राज्य सरकारकडून 12 क्रीडा प्रकारांची निवड करून दरवर्षी 160 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे खेलो इंडिया, राष्ट्रीय स्पर्धेतील आपले क्रीडापटू जागतिक स्पर्धेत राज्याचे नाव उज्ज्वल करतील, अशी आशाही सर्व खेळाच्या संघटनांनी व्यक्त केली आहे.