कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता टोकियो ऑलिम्पिक सोहळा एक हजाराच्या आतमध्ये विशेष पाहुणे आणि परदेशी प्रतिनिनिधींच्या साक्षीने होण्याची शक्यता आहे. याआधी, 10 हजार लोकांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्याचा स्पर्धा आयोजकांचा विचार होता. मात्र, आता मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थित ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा होईल, असे वृत्त स्थानिक मीडियाने दिले आहे.
क्योदो न्यूजने म्हटले की, 23 जुलैला राष्ट्रीय स्टेडियममध्ये होणाऱया ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जपानमधील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता टोकियोमध्ये दोन आठवडय़ांची आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या दरम्यानच ऑलिम्पिक उद्घाटन होणार असल्याने हा कार्यक्रमही कमी लोकांच्या उपस्थित घेण्याचे नियोजन सुरु आहे. जपानचे राजे नारुहितो ऑलिम्पिकचे उद्घाटन करून क्रीडा महोत्सवास सुरूवात झाल्याची घोषणा करतील. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडेन यांच्या पत्नी जिल बाइडेन या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जपानमध्ये सहा महिन्यांत या दोन दिवसांत कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक झपाटय़ाने वाढ झाली आहे. त्यामुळे ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याला कात्री लावण्यासाठी स्पर्धा आयोजकांनी नियोजन सुरू केले आहे.






























































