
सामना प्रतिनिधी । ठाणे
ठाणे ऍकॅडमीच्या ओम गवंडीने भुवनेश्वर येथे केबीएस स्कूल राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान 14 वर्षांखालील मुले गटात सुवर्णपदक पटकावून ठाणे बॅडमिंटन ऍकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
केबीएस स्कूलचे विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात या स्पर्धेत सहभागी झाले होते. 11 वर्षीय ओम याला सुवर्णपदकासाठी आठ फेऱयांचा प्रवास करावा लागला.
प्रथम फेरीत पुढे चाल मिळालेल्या ओमने दुसर्या फेरीत चेन्नईच्या बलावानचा 21-6 असा पराभव केला. पुढे तिसर्या, चौथ्या व पाचव्या फेरीत त्याने अनुक्रमे गुलाम असीम, वाराणसी 21-5, केव्हिन झेवियर, एर्नाकुलम 21-4, शिवकुमार, दिल्ली 21-3 असा विजय संपादन केला. उपांत्य व अंतिम सामन्यातही बलाढय़ ओमला विजयासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत.
उपांत्य सामन्यात त्याने पार्थ, चंदिगढ 21-5, 21-7 असा पराभव केला. अंतिम सामन्यातही त्याने परम बोरा, आसाम याचा सरळ गेममध्ये 21-8, 21-6 असा एकतर्फी पराभव करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले. ऑल इंडिया बॅडमिंटन विजेता ओमने या स्पर्धेत कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला दुहेरी अंकात गुणांपर्यंतही पोहोचू न देता खेळात निर्विवाद वर्चस्व राखले. ओमने या यशाचे श्रेय ठाणे ऍकॅडमीचे सर्वेसर्वा श्रीकांत बाड, वरिष्ठ प्रशिक्षक श्रीकांत भागवत, मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर यांना दिले.





























































