
कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचं सावट सध्या सगळ्या जगावर पसरलं आहे. त्यात नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनमुळे धास्तीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनच्या संक्रमणाच्या भीतीमुळे जगभरात 4 हजारांहून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
शुक्रवारी ही संख्या 2259 इतकी होती. त्यात शनिवारी अजून 1300 उड्डाणांची भर पडली. तर, 5700 उड्डाणे उशिराने सुरू आहेत. लुफ्तान्झा, डेल्टा, युनायटेड एअरलाईन्स या आणि अशा अनेक विमान कंपन्यांच्या फ्लाईट्सचा त्यात समावेश आहे.
यातील बहुतांश विमाने ही पायलट, केबिन क्रू इत्यादींच्या आजारपणामुळे रद्द होत आहेत. अमेरिकेत उड्डाणे रद्द होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. विमान कंपन्यांनी यासाठी ग्राहकांची क्षमा मागितली आहे. तर दुसरीकडे नाताळ निमित्त कुटुंबांसोबत वेळ घालवण्याच्या बेतात असलेल्या अनेकांच्या पदरी निराशा आली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाताळ सणाचा आनंद न घेता आल्याने यंदा अनेकांना या सणाची उत्सुकता होती. मात्र, ओमायक्रॉनच्या संकटामुळे आता पुन्हा त्यांच्या उत्साहावर पाणी फेरलं आहे.





























































