
मुंबईत ओमायक्रोन रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेने पुन्हा एकदा दुसऱया लाटेप्रमाणे बेडची उपलब्धता करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी 40 हजार बेड तर हायरिस्क कॉण्टॅक्टसाठी 30 हजार बेड तैनात करण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत पालिकेकडे 30 हजार बेड ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे ओमायक्रोनमुळे रुग्णसंख्या वाढल्यास एक लाख बेड तैनात करता येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सद्यस्थितीत उपलब्ध बेडवर फक्त पाच ते सात टक्केच रुग्ण असले तरी ओमायक्रोनच्या वेगाने वाढणाऱया गुणधर्मामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईतील दाटीवाटीच्या झोपडपट्टीत क्वारंटाइन नियम पाळणे शक्य नसल्यामुळे या भागातील रुग्णांचा विचार लक्षणे नसलेल्यांसाठी करून खास 40 हजार बेड तर हायरिस्क कॉण्टॅक्टसाठी पालिकेने नियोजन केले आहे. कोरोनाच्या दोन लाटांमध्ये मुंबईकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र ओमायक्रोनचा धोका वाढलेला असल्याने खबरदारीची गरज आहे असे ते म्हणाले.
90 टक्के ओमायक्रोन रुग्णांमध्ये लक्षणेच नाहीत
- ओमायक्रोन बाधितांसाठी पालिकेने अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात एका पूर्ण मजल्यावर विशेष वॉर्ड तैनात केला आहे. तर दोन बडय़ा खासगी रुग्णालयांतही प्रत्येकी 10 बेड तैनात ठेवण्यात आले आहे.
- ओमायक्रोनबाधित आढळलेल्या 31 रुग्णांपैकी 18 डिस्चार्ज जणांना देण्यात आला आहे. तर इतर दाखल रुग्णांमधील 90 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.


























































