टेन्शन वाढलं! ‘स्टील्थ ओमायक्रॉन’चे देशात 530 रुग्ण सापडले, RTPCR चाचणीलाही देतोय चकवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने थैमान घातले आहे. हजारोंमध्ये सापडणारी रुग्णसंख्या आता लाखांवर पोहोचली आहे. अशातच ओमायक्रॉनचा नवा स्ट्रेनही सापडला  असून हा स्ट्रेन आरटीपीसीआर चाचणीलाही चकवा देत असल्याने खळबळ उडाली आहे.

ओमायक्रनचा BA.2 हा नवा स्ट्रेन (स्टील्थ ओमायक्रॉन) हिंदुस्थानमध्येही सापडला आहे. हिंदुस्थानमध्ये नव्या स्ट्रेनचे 530 रुग्ण आढळले आहेत. या स्ट्रेनने ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला असून यामुळे आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंटचे तीन सब व्हेरिएंट आहेत. BA.1, BA.2 आणि BA.3 अशी या तीन सब व्हेरिएंटची नावे आहेत. यातील BA.1 व्हेरिएंट जगभरात पसरला असून आता BA.2 हा व्हेरिएंटही वेगाने पसरत आहे. याचा वेग अधिक आहे.

ब्रिटनमध्ये धुमाकूळ

होल जीनोम सिक्वेंसींग (WGS)ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनने धुमाकूळ घातला असून रुग्णसंख्या लाखोंमध्ये पोहोचली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे BA.2 स्ट्रेनचे आहेत. या नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण 6 डिसेंबर 2021 ला सापडला होता आणि महिन्याभरात हा नवा स्ट्रेन जगभरातील 40 देशांमध्ये पसरला आहे.

किती घातक?

ओमायक्रॉनचा नवा स्ट्रेन BA.2 किती घातक आहे हे सध्या तरी सांगणे कठीण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यूकेएचएसएच्या कोविड 19 इन्सिडेंट डायरेक्टर डॉ. मिरा चंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनच्या सुरुवातीच्या BA.1 या स्ट्रेनच्या तुलनेन BA.2 हा नवा स्ट्रेन अधिक वेगाने पसरत आहे. BA.2 चे खास म्यूटेशन नसल्याने याला डेल्टापासून वेगळे केले जाऊ शकते असेही त्यांनी म्हटले.

दिलासादायक आकडेवारी

दरम्यान, हिंदुस्थानमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. 3 लाख 50 हजारांवर गेलेला आकडा आता 3 लाख 6 हजार 64 वर आला आहे. गेल्या 24 तासातील ही आकडेवारी दिलासादायक म्हणावी लागेल. मात्र 4329 रुग्णांचा मृत्यू झाला असून सक्रिय रुग्णसंख्या 22 लाख 49 हजार 335 वर पोहोचली आहे.