‘ओमकार’ला तीन दिवसांत पकडणार, वनविभागाने केला निर्धार

सावंतवाडी तालुक्यातील सातोसे, मडुरा आणि कास गावात ओमकार हत्तीने धुमाकूळ घातला असून शेतीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त कास ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक मिलीश कुमार हे मोहिमेच्या पाहणीसाठी आले असता त्यांना धारेवर धरले. यावर शर्मा यांनी येत्या दोन-तीन दिवसांत हत्तीला पकडले जाईल, असा विश्वास ग्रामस्थांना दिला. हत्तीला पकडण्यासाठी खास प्रशिक्षित टीम दाखल झाली असून त्यांचे नियोजन सुरू असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना भरपाई मिळणार

हत्तीकडून होणाऱया नुकसानीकडे स्थानिकांनी मिलीश कुमार यांचे लक्ष वेधले. यावर उपवनसंरक्षकांनी सांगितले की, वनविभागाचे कर्मचारी नुकसानग्रस्त शेतकऱयांच्या घरी जाऊन कागदपत्रे जमा करतील. सामाईक क्षेत्रासाठी शेतकऱ्यांचे हमीपत्र घेऊन त्यांना भरपाई दिली जाईल. ई पीक नोंदणीत संबंधित पिकाची नोंद नसेल, तर महसूल विभागाकडून नोंदणी करून घेतली जाईल. सत्य परिस्थिती पाहून पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱयांना भरपाई दिली जाईल.