
मुंबईतील नौदल गोदीवर रविवारी दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा फोन आला. या फोननंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. धमकीनंतर गोदीत सुरक्षा तपासणी केली असता काहीच संशयास्पद आढळले नाही. पोलिसांनी कॉल करणाऱ्याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा प्रकरणाची चौकशी करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, जहांगीर शेख नावाच्या एका व्यक्तीने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्याने सांगितले की तो आंध्र प्रदेशातून फोन करत आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने त्याला नौदल गोदीवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती दिली होती आणि त्याला सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. कॉल आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ प्रोटोकॉलनुसार तपास सुरू केला, परंतु अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती सापडली नाही.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी जहांगीर शेख नावाच्या कॉल करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. कॉल केला तेव्हा आपण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले. तथापि, हे फक्त मद्यधुंद अवस्थेत केलेले कृत्य होते की काही कट आहे हे शोधण्यासाठी पोलीस सध्या तपास करत आहेत.
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, मुंबई पोलीस हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतले आहे. जहांगीर शेखला कुणी फोन करण्यास सांगितले होते याबाबतही पोलीस तपास करत आहेत.




























































