महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी!! दीड कोटी लोकांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत देशात आधीपासूनच अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राने दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा मैलाचा दगड रोवला आहे. यापुढे दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दीष्ट राज्य सरकारने समोर ठेवले असून केंद्र सरकारकडून पुरवठा झाल्यास तेही उद्दीष्ट साधता येईल असे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 1 मेपासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत असून यासाठी सुमारे 12 कोटी डोसेसची आवश्यकता आहेत. ऑक्सिजन वापराबाबतही एसओपी निश्चित करण्यात आली असून रुग्णालयांना नंदुरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी बोलताना राज्यातील लसीकरणाच्या स्थितीविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे राज्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्धतेबाबतही भाष्य केले. लसीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून एवढय़ा मोठय़ा संख्येच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे मोठे आव्हान आहे. ही लस सरसकट मोफत द्यायची कि आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना याबाबतचा अंतीम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल. त्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पाठविला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

आता एकच लक्ष्य

रोज 8 लाख जणांना लस टोचणार
ऑक्सिजनच्या वापराबाबत एसओपी तयार
नंदुरबार पॅटर्ननुसार ‘ऑक्सिजन नर्स’ची व्यवस्था करणार
1 मेपासून 18 वर्षांवरील 5 कोटी
71 जणांचे लसीकरण
12 कोटी डोस लागणार

ऑक्सिजनचा काटकसरीने वापर

राज्यात सध्या 1615 मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे. नंदुरबार जिह्यामध्ये ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबविण्यात आली असून 50 रुग्णांसाठी एक नर्स नेमून तिच्या माध्यमातून ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवले जाते. हाच प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकार निकराने लढत आहे. शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेनं काम करत आहेत. पारदर्शकपणे परिस्थिती हाताळत आहेत.
– सोनिया गांधी, कॉँग्रेस अध्यक्षा

लसीकरणासाठी परदेशातून लसी आयात करण्याचा आमचा विचार आहे. लसींचे योग्य वितरण झाल्यास लसीकरणाची मोहीम अधिक व्यापक होईल, हे नक्की.
– राजेश टोपे, आरोग्यमंत्री

ऑक्सिजन, रेमडेसिवीरसाठी जागतिक निविदा

ऑक्सिजन, रेमडेसिवीर उलब्धतेसाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्याद्वारे 40 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 132 पीएसए, 27 ऑक्सिजन टँक, 25 हजार मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन आणि 10 लाख व्हायल्स निविदेद्वारे मागविण्यात येणार आहेत.

सिरम इन्स्टिटय़ूट, भारत बायोटेकला पत्र

1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी 12 कोटी डोसेस लागतील. त्याच्या उपलब्धतेविषयी आरोग्य विभागामार्फत सिरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

लस घेताय? हे कराच!

18 ते 44 वयोगटातील लसीकणासाठी राज्याला 12 कोटी डोसेसची आवश्यकता भासणार आहे. या वयोगटाला लस देण्यासाठी वेळेची निश्चित केली जाणार आहेत. यासाठी काही सूचनाही आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

लसीकरणासाठी कोविन अॅपवर किंवा https://selfregistration.cowin.gov.in या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम मोबाईल नंबर रजिस्टर करा आणि त्यावर आलेला ओटीपी अवश्य नोंदवा. आपला आधार क्रमांक अवश्य नोंदवा. त्यानंतर आठवणीने जन्म वर्ष टाका.
वरील माहिती पडताळून रजिस्टर करा.
पिन कोड टाका व त्यांनुसार आलेल्या तारखेला लसीकरण केले जाईल.
त्यासंदर्भात 2 मेसेज येतील. त्यातील पहिला मेसेज रेफरन्स आयडी असेल.
हा रेफरन्स आयडी तुम्हाला लसीकरण केंद्रावर गेल्यावर दाखवायचा आहे.
दुसरा मेसेज कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे याचा आहे.
1 मेपासून लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.