
सामना ऑनलाईन । बंगळुरू
पत्रकार-कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आज विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एकाला अटक केली. परशुराम वाघमारे (२६) असे या तरुणाचे नाव असून त्याला विजयपुरा जिल्हय़ातील सिंधगी येथून ताब्यात घेण्यात आले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी एसआयटीची १४ दिवसांची कोठडी बजावली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात त्याचा थेट सहभाग असल्याचा कोणताही पुरावा सध्या तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, त्याचा या हत्याकांडाशी संबंध असल्याची शक्यता आहे, असे एसआयटी पथकाचे प्रमुख आणि पोलीस महानिरीक्षक बी. के. सिंह यांनी सांगितले. लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आधीच चार जणांना अटक करण्यात आली आहे.


























































