खानावळीसाठी येणाऱ्या इसमाची डोके ठेचून हत्या

सामना ऑनलाईन । मुंबई

खानावळीसाठी येणाऱ्या इसमाची आईसोबत वाढत असलेली जवळीक खटकली आणि त्यातून मुलाने त्या इसमाची डोके ठेचून हत्या केल्याची घटना मुलुंड येथे घडली.

मुलुंड परिसरात एक महिला खानावळ चालवते. तिच्याकडे देवेंद्र सिंग (55) हा इसम खानावळीसाठी यायचा. देवेंद्र आणि त्या महिलेची जवळीक वाढली होती आणि ही बाब त्या महिलेच्या मुलाला खटकत होती. 22 एप्रिलच्या रात्री रवी (26) हा त्याच्या घरी गेला असता तेव्हा देवेंद्र हा घरात झोपलेला होता. त्याला बघून रवीची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने रागाच्या भरात झोपलेल्या देवेंद्रला मारण्यास सुरुवात केली. रवीने देवेंद्रचे डेके सिमेंटच्या जमिनीवर अनेक वेळा आदळले. त्यातच देवेंद्रचा मृत्यू झाला. हा प्रकार कळताच मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे, एपीआय अविनाश पोरे, सचिन कदम, उपनिरीक्षक फैयाज मुलानी, संभाजी वडते आदींच्या पथकाने तत्काळ शोधशोध सुरू करून आरोपी रवीच्या मुसक्या आवळल्या.