ईदची शॉपिंग जिवावर बेतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ईदसाठी कपड्यांची शॉपिंग कुर्ला येथील तरुणाच्या जिवावर बेतली. बंदी असतानाही जे. जे. उड्डाणपुलावर मोटरसायकल घेऊन जाताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुर्ला येथील विनोबा भावे नगरमध्ये राहणारा इराज खान (१९) हा जवळच राहणाऱ्या अरबाज उस्मानी, शाहनवाज खान, ओसामा साजिद खान या तीन मित्रांना घेऊन दोन मोटारसायकलवरून बुधवारी रात्री घरातून निघाला. दोन दिवसांवर आलेल्या ईदसाठी कपडे आणि इतर वस्तूंची खरेदी करायची असल्याने चौघे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघाले. बंदी असताना आणि पोलीस मनाई करत असल्याचे पाहूनही या चौघांनी जे. जे. उड्डाणपुलावर मोटारसायकली नेल्या. पोलीस पाठलाग करतील या भीतीने त्यांनी मोटारसायकलचा वेग वाढवला. यामुळे अरबाज याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल दुभाजकावर आदळली. अरबाज आणि मागे बसलेला इराज दुभाजकाच्या पलीकडे फेकले गेले. याचदरम्यान समोरून येणाऱया कारवर ते आदळले. पाठीमागे असलेल्या शाहनवाज आणि ओसामा यांचेही मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचीही मोटारसायकल अपघातग्रस्त झाली.

जे. जे. उड्डाणपुलावर झालेल्या या अपघातानंतर ये-जा करणाऱयांनी चौघांनाही जे. जे. रुग्णालयात नेले. इराज याचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. अरबाज याची प्रकृती गंभीर असून शाहनवाज आणि ओसामा किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर कुर्ल्याच्या विनोबा भावे नगर परिसरावर शोककळा पसरली आहे. आईवडील उत्तर प्रदेशमध्ये गावी असल्याने इराज याचे पार्थिव अॅम्ब्युलन्सने गावी नेण्यात आल्याचे त्याची चुलत बहीण हीना हिने सांगितले.

बारावीत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण
इराजचे आईवडील गावी राहत होते. तो आणि लहान बहीण काकांकडे राहत होते. इराज नोकरी करून शिकत होता. नोकरी करून पैसे जमविले होते. त्या पैशांतूनच तो खरेदी करायला गेला होता. इराजने बारावीची परीक्षा दिली होती आणि त्यात तो चांगल्या मार्कांनी पास झाला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे खान कुटुंबीयांना धक्का बसला आहे.