कोपरगावमध्ये सारीमुळे तिसऱ्या महिलेचा बळी; मनाई वस्ती सील

829

कोपरगाव तालुक्यातील मनाई वस्ती संवत्सर येथील रहिवाशी असलेल्या 22 वर्षीय महिलेचा कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी सारी आजाराने मृत्यू झाला आहे. या महिलेवर क्षयरोगाचे उपचार सुरु होते. महिलेचा स्त्राव कोरोना तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आला आहे. अहवाल येईपर्यंत मनाई वस्ती सील करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संतोष विधाटे (तालुका आरोग्य अधिकारी) यांनी दिली आहे.

सारी संसर्गजन्य आजाराने कोपरगावमध्ये तिसऱ्या महिलेचा बळी घेतला. कोपरगाव शहरातील लक्ष्मी नगर भागातील एका 55 वर्षाच्या महिलेचा तर शिंगणापूर येथील एका 45 वर्षाच्या महिलेचा सारी आजाराने काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी सकाळी 10 वाजता कोपरगाव तालुक्यातील मनाई वस्ती संवत्सर येथील एका 22 वर्षीय विवाहितेचा सारी आजाराने मृत्यू झाला. 500 लोकसंख्या असलेली मनाई वस्ती सील करण्यात येणार आहे. महिलेच्या घरातील व्यक्तींना आणि निकट संपर्कातिल व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सारीने आणखी एक मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेसह तालुक्यात खळबळ उडाली आहे. येथील 22 वर्षीय विवाहित महिलेला घसा, सर्दी, खोकला असा त्रास होता. तसेच कफ वाढल्याने दम लागत होता. या महिलेला शुक्रवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी या महिलेचा मृत्यु कोरोना किंवा सारी आजाराने झाल्याचा संशय व्यक्त करीत मृत महिलेच्या घशाचे स्राव पुढील तपासणीसाठी नगर येथे पाठविले आहे. या महिलेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या