दिलासादायक बातमी; आणखीन एका औषधाची चाचणी सुरू

देशभरात सध्या कोरोनाच्या औषधासाठी संशोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना आता यश येताना दिसत असून हिंदुस्थानात आणखीन एका औषधाची चाचणी सुरू केल्याचे समोर आले आहे. सीएसआयआर व लक्साई लाइफ सायन्सेसच्या ‘कोलचिसिन’ या औषधाच्या चाचणीसाठी भारतीय औषध महानियंत्रकांनी हिरवा कंदील दर्शविला आहे.

भारतीय औषध महानियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध कोविड प्रतिबंधासाठी वापरता येऊ शकणार आहे. याच्या चाचणीसाठी मान्यता देण्यात आली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना ‘सीएसआयआर’च्या महासंचालकांचे सल्लागार राम विश्वाकर्मा म्हणाले की,  हृदयरोग व इतर सहआजार असलेल्या व्यक्तींमध्ये या औषधाचा वापर करता येऊ शकतो. अपायकारक सायटोकिन्सवरही त्याचा उपयोग होऊ शकेल. कोविड असलेल्या रुग्णांत उपचारानंतर हृदयविकारात गुंतागुंत निर्माण होते. त्यातून अनेक लोकांचे प्राण गेले होते. त्यामुळे त्यासाठी फेरउद्देशित औषध किंवा नवीन औषधे शोधण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  • ‘सीएसआयआर’समवेत या चाचण्यांत इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हैदराबाद तसेच जम्मूची भारतीय एकात्मिक वैद्यक संस्था सहभागी आहेत.
  • या चाचणीनुसार त्याच्या दुसऱया टप्प्यातील सुरक्षा व परिणामकारकता चाचण्या घेण्यात येतील. कोविड-19 रुग्णांवरील उपचारात वैद्यकीय परिणामकारकता सुधारण्यासाठी हे औषध उपयोगी आहे.
  • लोकांनी चाचण्यांसाठी नावे नोंदवली असून हिंदुस्थानात अनेक ठिकाणी 8 ते 10 आठवडय़ांत या चाचण्या करण्यात येणार आहेत. चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आल्यास या औषधाच्या वापराचा मार्ग मोकळा होणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या