
सामना ऑनलाईन । मुंबई
रस्त्यात कुठल्याही कारचालकांना थांबवायचे. कारच्या बोनेटमध्ये स्पार्क होऊन धूर येत आहे. कधीही स्फोट होऊ शकतो, अशी बतावणी करून कार दुरुस्त करायच्या बहाण्याने चालकांना फसविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
जाहीद नूर मोहम्मद शेख (२८) असे त्या भामटय़ाचे नाव असून तो गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरात राहतो. रस्त्यात कुठल्याही कारचालकाला थांबवायचे व बोनेटमधून धूर येत असल्याचे सांगून कार रस्त्याच्या कडेला घेण्यास भाग पाडायचे. मी स्वतः मॅकेनिक असून कार दुरुस्त करून देतो, असे सांगायचे. त्यानंतर गाडीचा एकादा मोठा पार्ट खराब झाल्याचे भासवून तो पार्ट बदलून देतो, असे सांगत चालकांकडून पैसे घेतो आणि त्यांची फसवणूक करतो, अशी जाहीदची मोडस ऑपरेंडी आहे. पवई येथे अशाच प्रकारे गुन्हा करताना गुरुवारी पवई पोलिसांनी त्याला पकडले. जाहीदविरुद्ध अशा स्वरूपाचे देवनार, डोंगरी, कुर्ला, सांताक्रुझ, वनराई, वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. असे गुन्हे त्याने त्याच्या साथीदारासोबत केले असल्याचे तपासात समोर आले आहे.


























































