पोलिसांच्या आठ तास ड्युटीला एक हजार दिवस पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

15 मे 2016 रोजी मुंबई पोलीस दलात सुरू झालेल्या आठ तास डय़ुटीला एक हजार दिवस पूर्ण झाले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली आठ तास डय़ुटी आता शहरातील 93 पैकी 90 पोलीस ठाण्यांत यशस्वीरीत्या सुरू आहे.

पोलिसांना 12 हून अधिक तास काम करावे लागत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत होता. तसेच कुटुंब, नातेवाईकांना वेळ देता येत नव्हता. सामाजिक कार्यक्रमातदेखील सहभागी होता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांची डय़ुटी आठ तासांची करावी अशी मागणी पोलीस पत्नींकडून केली जात होती. 2016 साली तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या मागणीची गंभीर दखल घेऊन पोलीस अंमलदार रवींद्र पाटील यांनी अभ्यासपूर्ण तयार केलेल्या आठ तास डय़ुटीच्या चार्टनुसार सुरुवातीला पूर्व उपनगरातील दोन-तीन पोलीस ठाण्यांत आठ तास डय़ुटीचा प्रयोग सुरू केला.

हा प्रयोग यशस्वी होऊ लागल्यानंतर पडसलगीकर व सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी टप्प्याटप्याने आठ तास डय़ुटीचा प्रोजेक्ट वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत राबविण्यास सुरुवात केली. दरम्यान, पडसलगीर यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर दिल्लीतून आलेले सुबोधकुमार जायसवाल यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. जायसवाल यांनीदेखील आठ तास डय़ुटीला आणखी प्रोत्साहन देत जवळपास प्रत्येक पोलीस ठाण्यातील अंमलदारांना तीन शिफ्टमध्ये आठ तास डय़ुटी सुरू केली. वरिष्ठ अधिकाऱयांच्या पाठिंब्यामुळे शहरात आठ तास डय़ुटीला शहरात एक हजार दिवस पूर्ण झाले आहेत.

कुटुंबांमध्ये आनंद
आठ तास डय़ुटीमुळे अंमलदार वेळेत घरी जात असून ते कुटुंबाला पाहिजे तितका वेळ देत आहेत. शिवाय त्यांना वेळेत जेवण करता येत असून समाजाला, मित्रपरिवाराला वेळ देता येत आहे. तसेच आपला छंद जोपासण्यासही वेळ मिळत असल्याने अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.