हिंस्त्र वन्य प्राणी असलेल्या जंगलात हरवली एक वर्षांची चिमुरडी…वाचा पुढे काय झाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियामध्ये एक विचित्र आणि आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. अनेक हिंस्त्र आणि वन्य प्राणी असणाऱ्या घनदाट जंगलात एक वर्षांची चिमुरडी हरवली होती. या जंगलात हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार असल्याने या चिमुरडीवर एखाद्या वन्य प्राण्याने हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे ही चिमुरडी तब्बल तीन दिवसांनी सुखरुप सापडली आहे. या जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी असताना ती तीन दिवसानंतरही सुरक्षित आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. द मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ल्यूडा क्युजिना नावाची एक वर्षांची चिमुरडी आपल्या आईसोबत पार्कमध्ये गेली होती. तिथे खेळताना ती आईपासून दूर निघून गेली. खेळत खेळत ती जंगलात शिरली. मुलगी जवळपास दिसत नसल्याने तिच्या आईने पोलिसांना याची माहिती दिली. तिचा शोध घेण्यात आला. मात्र, ती सापडली नाही. पोलीसांनी पथके स्थापन करून मुलीसाठी शोधमोहीम राबवली. तसेच स्मोलेस्क भागातील ओबिंस्कजवळच्या जंगलात सुमारे 500 जण या मुलीचा शोध घेत होते. मात्र, ती सापडली नाही.

ती हरवल्यानंतर दोन दिवस उलटल्यावरही ती सापडत नसल्याने एखाद्या वन्य प्राण्याने तिच्यावर हल्ला केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, तिसऱ्या दिवशी शोध मोहिमेतील एक पथकाला ल्यूडा जंगलात दिसली. शोध मोहिमेने थकलेले बचाव पथक विश्रांतीसाठी एका झाडाखाली थांबले होते. त्यावेळी त्यांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांनी त्या भागात शोध घेतला असता त्यांना ल्यूडा दिसली.

तीन दिवसानंतर माणसे दिसल्याने ल्यूडा धावतच बचाव पथकाकडे गेली. पथकातील जवानांनी तिला उचलून घेत तिला शांत केले. तिला पाणी आणि खाऊ दिला. हिंस्त्र आणि वन्य प्राण्याचा संचार असलेल्या जंगलात ल्यूडा तीन दिवस सुरक्षित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच तीन दिवस तिने काय खाल्ले असेल, असा प्रश्नही बचाव पथकाला पडला. तिच्या अंगावर कोणत्याही प्राण्याने हल्ला केल्याच्या काहीही खूण नव्हत्या. जंगलातील किड्यांनी तिला चावा घेतला होता. त्यामुळे ती रडत होती, तिच्या रडण्याच्या आवाजामुळेच ती बचाव पथकला सापडली. बचाव पथकाने ल्यूडाला तिच्या आईकडे सूपूर्द केले आहे. ल्यूडाला बघताच तिच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता. या घटनेची चर्चा रंगली असून या जंगलात तिने तीन दिवस आणि तीन रात्री कशा काढल्या असतील, यावर चर्चा रंगली आहे.