उष्णतेच्या लाटेत पिकांचीही होरपळ, निम्म्यापेक्षा अधिक शेतमाल उद्ध्वस्त; मासाग कांद्याचे पूर्ण नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरपासून उत्तरेकडील सर्व राज्यांत आणि मध्य हिंदुस्थानापासून महाराष्ट्रात सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. सूर्यकिरणांच्या तीव्र चटक्याने शेतातील उभ्या शेतीमालाचे निम्म्यापेक्षा अधिक नुकसान झाले. मागास लागवड झालेला उन्हाळी कांदा यात पूर्ण होरपळून गेल्याने जवळपास नष्ट झाला.

36 ते 38 अंश सेल्सिअस तापमानातच पिकाच्या पानातून वेगाने बाष्पीभवन होते, पान कोरडे पडते. यामुळे फूल आणि फळांची गळ होते. सध्या यापेक्षाही अधिक तापमानामुळे तीव्र परिणाम भाजीपाला पिकावर होत असल्याने ते पूर्णच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जानेवारीनंतर लागवड केलेला मागास कांदा तर शेतात होरपळून पूर्ण नष्टच झाला आहे. डाळिंब, पेरू, आंबा किंवा इतर फळे-भाजीपाला पिकांवर सनबार्ंनगचा मोठा परिणाम होऊन फळांवर तपकिरी रंगाचे चट्टे वाढल्याने ती नष्ट होतील किंवा विक्रीयोग्य राहणार नाहीत.

उसाचे क्षेत्र यावर्षी मोठे असल्याने कारखान्यांचे गळीत हंगाम लांबले. ऊसतोड लांबल्याने शेतातील उभा ऊस तीव्र उन्हाने वाळला आहे. उसाला तुरे फुटल्याने पोकळपणा वाढला आणि वजनात घट झाल्याने उसाचे पीकही यंदा तोट्याचेच ठरले. जनावरांचा उभा चारा तर अनेक शेतात वाळल्याने जनावरांची मोठी उपासमार होत असून इच्छा असूनही विकतचा चाराही मिळणे मुश्किल झाले आहे. तापमान अधिक वाढले तर शेतात उभा असलेला कांदा 15 दिवसांत काढणीला येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादनात मोठी घट होणार आहे.

उष्णतेच्या लाटेचे अर्थकारणावरही अनिष्ट परिणाम होणार

सध्या हवेची आर्द्रता 10 ते 15 टक्क्यांवर आली आहे. वास्तविक हे प्रमाण 20 ते 25 टक्के इतके हवे. निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत असल्याने उष्णतेच्या लाटेने शेतातील सर्वच उभ्या पिकांची हानी झाली आहे. शेती उत्पन्नात घट झाल्यास त्याचा मोठा परिणाम शेतकरी, बाजारपेठ आणि ग्राहकावर होईल. मागणीच्या प्रमाणात पुरवठा न झाल्यास महागाई वाढण्याचे संकेत आहेत. ही उष्णतेची लाट शेती तर नष्ट करेलच अर्थकारणावरही याचे अनिष्ट परिणाम होणार आहेत.

निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. सध्या 40 अंश सेल्सिअस असणारे तापमान 14 ते 16 तारखेपर्यंत 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि ला-निनाच्या प्रभावातून निर्माण होणाऱ्या उष्णतेचा हा उच्चांक ठरेल.
– वीरेंद्र थोरात, हवामान अभ्यासक, वीरगाव, ता. अकोले.