कांदा निर्यातीवर बंदी ; ग्राहकांची दिवाळी, शेतकर्‍यांचं दिवाळं

736
onion

कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा याठिकाणी आलेल्या महापुराचा फटका यंदा कांद्याच्या उत्पादनाला बसला. त्यामुळे बाजारात कांदाच उपलब्ध नाही. परिणामी, कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. हे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने विविध प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवरच बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बाजारात मोठय़ा प्रमाणावर कांदा उपलब्ध होईल, तसेच कांद्याचे दरही घसरतील. परंतु, शेतकर्‍यांना मिळणारा दरही घसरणार असल्याने ग्राहकांची दिवाळी होईल तर शेतकर्‍यांचं दिवाळं निघणार आहे. ऐन सणासुदीत कांदा शेतकर्‍यांना अक्षरशः रडवणार आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी कांद्याचे निर्यातमूल्य वाढवले तर आता निर्यातीवरच बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना डबल फटका बसला आहे. 13 सप्टेंबर रोजीच विदेश व्यापार महासंचालनालयाने कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी किमान निर्यात मूल्यात प्रती टन 850 अमेरिकन डॉलर इतकी वाढ केली होती. तरीही वाढत्या मागणीनुसार बाजारात कांद्याचा पुरवठा होत नव्हता. अखेर सरकारने कांद्याच्या निर्यातीवरच बंदी घातल्याने कांद्याचे दर धडाधड कोसळणार आहेत.

शेतकर्‍यांचा कडाडून विरोध

केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णयाचा थेट फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. हा निर्णय म्हणजे निव्वळ पोरखेळ असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. शेतकर्‍यांना जेव्हा कांदा 50 पैसे दराने विकण्याची वेळ आली होती. जेव्हा कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागला होता. तेव्हा सरकारने असा निर्णय घेतला नाही. आता सरकार व्यापार्‍यांनाही दम भरत आहे. देशातील परिस्थितीचा कांद्याच्या दरावर फारसा परिणाम होणार नाही. असे असताना सरकार शेतकर्‍यांच्या मुळावर का उठले आहे अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

केंद्र सरकार कडून उपाययोजना

  • कांद्याचे गगनाला भिडलेले दर लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशभरात 50 हजार टन कांद्याची साठवणूक केली आहे.
  • बाजारात किती प्रमाणात कांदा उपलब्ध आहे, याचा अंदाज घेण्यात आला. त्यासाठी संयुक्त सचिव दर्जाच्या दोन अधिकार्‍यांना शेतकरी, व्यापार्‍यांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रात पाठवण्यात आले.
  • मोठय़ा प्रमाणावर कांदा बाजारात उपलब्ध व्हावा आणि कांद्याचे दर कमी व्हावेत यासाठी सरकारने राज्यपातळीवर आढावा घेतला. त्यानंतर निर्यातीवर बंदी घातली.
  • महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ज्या भागात कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होते तेथील शेतकर्‍यांकडून जर बाजारात कांद्याचा पुरवठा झाला नाही तर कडक कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने गेल्याच महिन्यांत दिला होता.

सध्या कांद्याची काय परिस्थिती

  • बाजार समित्यांमध्ये कर्नाटक आणि गुजरातमधून कांद्याची आवक होते. परंतु, महापुरामुळे येथील कांदा उत्पादनच घटले आहे.
  • जूनमध्ये लागवड झालेला कांदा ऑक्टोबरनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.  

आजपासून दर घसरण्याची शक्यता

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने उद्या बाजार सुरू झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर कांदा उपलब्ध होणार आहे. देशभरातील साठवणूक केलेला कांदा बाजारात वळता होणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर उद्या सोमवारपासून घसरण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या