फलोत्पादनमुळे कांदा 70 रुपयांनी स्वस्त

पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्याने बाजारात उपलब्ध कांद्याचे दर 160 रुपये किलोपर्यंत पोचले असताना गोवा फलोत्पादन महामंडळाने नाशिक येथून कांदा खरेदी करून तो 90 रुपये दराने विक्रीस ठेवल्यामुळे गेले काही दिवस कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे त्रस्त झालेल्या लोकांना आज थोडा दिलासा मिळाला.

कांद्याचे दर वाढत असल्याची गंभीर दखल घेत गोवा राज्य सरकारने फलोत्पादन महामंडळातर्फे स्वस्त दराने कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. लासलगाव-नाशिक येथील कांद्याच्या बाजारपेठेमधून फलोत्पादन महामंडळाने पहिल्या टप्प्यात 25 टन कांदा खरेदी केला असून राज्यभरातील 1 हजारहुन अधिक फलोत्पादनच्या स्टॉलमधून आज त्याची विक्री करण्यात आली.स्वस्त दरातील कांदा खरेदी करण्यासाठी लोकांनी आज गर्दी केली होती.कांद्याचे दर वाढल्या नंतर जे फक्त अर्धा किलो कांदा खरेदी करत होते त्यांनी आज दोन-दोन किलो कांदे खरेदी केले.

कांद्याचे दर नियमित होईपर्यंत स्वस्त दराने कांदा लोकांना उपलब्ध करून दिला जाणार असून दोन दिवसाआड नाशिक येथून कांदा खरेदी करून लोकांना पुरवला जाईल, असे फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये यांनी स्पष्ट केले आहे. बाजारात 170 रुपये किलो दराने विक्री होत असताना फलोत्पादन महामंडळ आपल्या स्टॉल वरुन 129 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करत होते. आज नाशिक येथील स्वस्त कांदा उपलब्ध झाल्यामुळे129 रूपयांवरुन कांद्याचे दर 90 रुपयांवर आले आहेत.त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या