कांद्याच्या दरात घसरण सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारचे आयात धोरण, व्यापाऱयांवर घातलेली साठवणूक मर्यादा व बाजारात दाखल झालेला लाल कांदा यांच्या एकत्रित परिणाम होऊन सलग दुसऱया दिवशी नाशिक जिह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दर घसरला. उमराणे येथे एकाच दिवसात 2300 ने खाली येत कमाल भाव 4300 रुपये मिळाला. इतर बाजार समित्यांमध्येही दरात पाचशे ते बाराशे रुपयांनी घसरण झाली.

मागील महिन्यात जिह्यातील कांद्याला नऊ हजारांहून अधिक कमाल दर मिळाला होता. त्यानंतर केंद्राच्या निर्यातबंदी, साठवणूक मर्यादा व आयातीला दिलेले प्रोत्साहन यांसारख्या धोरणांमुळे दर गडगडले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत स्थानिक, तसेच अर्ली रेड कांदाही दाखल झाला आहे. त्यातच इजिप्तचा कांदा आयात केल्याने ही घसरण होत असल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

उमराणे बाजार समितीत काल उन्हाळचा कमाल 6600 रुपये भाव होता. व्यापाऱयांनी चार दिवस लिलाव बंद ठेवूनही भाव टिकून होता. मात्र एकाच दिवसात येथे कमाल दरात 2300, सरासरीत हजार रुपयांनी घसरण झाली. इतर बाजार समित्यांमध्ये कमाल दर 4000 ते 5601, तर सरासरी 3200 ते 4200 दरम्यान होते.

जिह्यातील बाजार समित्यांमधील किमान, कमाल, सरासरी दर व कंसात आवक क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे
लासलगाव – 1100-4711-3400(7000);
देवळा – 1500-4205-3700(4000);
पिंपळगाव – 1500-5601-3750(6000);
चांदवड – 1000-4800-3300(4000);
वणी – 3400-4950-4000(2000);
येवला – 1000-4950-3300(4500);
सिन्नर – 2500-4000-3200(4000);
कळवण – 3000-4800-4200 (3000).