ऑनलाइन शिक्षणाला हवी उन्हाळी सुट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील मे महिन्यापासून ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणाऱया शिक्षकांना उन्हाळी सुट्टी हवी आहे. शालेय शिक्षण विभागाने पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गेन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच दहावीच्या परीक्षाही आता रद्द करण्यात आल्या आहेत. शिक्षकांना आता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करायचे असून ऑनलाइन शिक्षणातून सुट्टी देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

दरवर्षी मार्च अखेरपर्यंत अध्ययन समाप्ती होऊन एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा घेण्यात येतात, त्यानंतर उन्हाळी सुट्टीला सुरुवात होते. पण यंदा कोरोनामुळे गणपती आणि दिवाळीतही विद्यार्थी, शिक्षकांना ऑनलाइन अभ्यासातून सुट्टी घेता आली नाही. ऑनलाइन वर्गासाठी तासन्तास मोबाईल, संगणक व लॅपटॉपसमोर बसल्याने विद्यार्थ्यांना मानेचे आणि डोळ्याचे आजार झाल्याच्या तक्रारी पालकांकडून येत असल्याचे शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी स्पष्ट केले. दिल्ली सरकारनेही 9 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर केली असून त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही सुट्टीचे आदेश जाहीर करावेत अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

शिक्षक संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, दहावीच्या उन्हाळी वर्गांना सुरुवात

नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करायचे असल्याने काही शाळांनी दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन उन्हाळी वर्ग सुरू केले आहेत. सततच्या ऑनलाइन अभ्यासामुळे पालकवर्गही वैतागले असून वर्षभराच्या ऑनलाइन अभ्यासामुळे काही काळ विद्यार्थ्यांना सुट्टी मिळावी जेणेकरून नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थी तणावमुक्त राहतील, असेही शिक्षक परिषदेने लेखी निवेदनात म्हटले आहे.