व्यवसायाच्या बहाण्याने लाडघरातील दोघांना 6 लाखांचा गंडा; गोव्यातील संशयितावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माय अर्निंग अॅपद्वारे वीज बिल, मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज करण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे आमिष दाखवत दापोली तालुक्यातील लाडघर येथील दोन जणांची 6 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोनजणांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गोव्यातील संशयित प्रज्ञेश प्रकाश ताम्हणकर याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबव्ही ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे दापोली येथील एका हॉटेलमध्ये डिसेंबर 2020 मध्ये एक सेमिनार घेण्यात आला होता. या सेमिनारमध्ये संशयित प्रज्ञेश ताम्हणकर याने जबव्ही ट्रॅव्हल्स अॅपची माहिती तसेच त्यातून होणाऱ्या फायदयाची माहिती दिली होती. त्यानंतर प्रज्ञेश ताम्हणकर यांनी याबाबत सतत पाठपुरावा केल्यामुळे लाडघर येथील तृप्ती बाळ या 1 जानेवारी 2021 पासून जबव्ही ट्रॅव्हल्स अॅपद्वारे मोबाइल रिचार्जचा व्यवसाय करू लागल्या. त्यासाठी त्या त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पैसे वर्ग करत होत्या.

ताम्हणकर यांनी बाळ यांच्या मोबाईलवर मेसेज केला तुम्ही माझ्या खात्यात 5 लाख 55 हजार रुपये वर्ग करा, मी तुमच्या अॅप अकाउंटला 99 हजार 999 चा जादा बँलस देतो. या त्याच्या प्रलोभनाला बळी पडत बाळा यांनी 3 लाख 16 हजार रुपये ऑनलाइनद्वारे ताम्हणकर यांच्या खात्यात जमा केले. ताम्हणकर यांनी बाळ यांच्या जबव्ही ट्रॅव्हल्स अॅप खात्यात 5 लाख 74 हजार 836 रूपयांचा बँलेस जमा केला. त्यानंतर या अॅपमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या व काही दिवसांनी हे अॅप बंद झाले. याबाबत बाळ यांनी ताम्हणकर यांच्याशी संपर्क साधला असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

बाळ यांनी दापोली येथे सेमीनारला आलेल्या गावातीलच अभिनय कर्देकर याच्याशी संपर्क साधला असता त्याचीही याच अॅपद्वारे 2 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समजले. त्यामुळे बाळ यांनी संशयित प्रज्ञेश ताम्हणकर (रा. बेंडवाडा हाऊस, सांगे, गोवा) याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. संशयित प्रज्ञेश ताम्हणकर याच्याविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.