
सामना ऑनलाईन । मुंबई
गुगल पे अकाऊंटच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एका भामटा नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करीत आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने भामट्यांची नवीन मोडस् ऑपरेंडी असल्याचे समोर आले आहे.
दादर-नायगावच्या बीडीडी चाळीत राहणारे अमोल चोरगे यांची गुगल पे अकाऊंटच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून अज्ञात भामट्याने ऑनलाइन फसवणूक केली आहे. भामट्याने चोरगे यांच्या गुगल पे खात्यातील तब्बल 57 हजार 900 रुपये आपल्या खात्यात वळते केले आहेत. चोरगे यांच्या चुलतभावाने गुगल पे खात्यातून एका सीएला 4500 रुपये पाठवले होते, परंतु तांत्रिक कारणामुळे ते पैसे सीएला मिळू शकले नाही. त्यामुळे भावाने कस्टमर केअरला फोन करून गुगल पेवरून पैसे जात नसल्याची तक्रार केली. तेव्हा दुसरे कोणाचे गुगल पे खाते आहे का, असे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगणाऱ्या भामट्याने भावाला विचारले. त्यामुळे भावाने मला कॉन्फरन्सवर घेऊन आम्ही तिघे एकमेकांशी बोलत होतो तेव्हा भावाचे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर करतो. मग ते पैसे तुम्ही सीएला पाठवा, असे तो भामटा म्हणाला. तसेच तुमच्या खात्यात किती पैसे जमा आहेत याचीदेखील त्याने विचारपूस केली.
दरम्यान, काही वेळाने माझ्या खात्यात 4500 जमा झाल्याचा मेसेज आला, परंतु त्या मेसेजमध्ये गडबड वाटत होती. माझे 57 हजार 900 रुपये दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर होतील असे म्हटले होते. त्यामुळे त्याबाबत विचारले असता अर्ध्या तासाने पुन्हा तुमच्या खात्यात पैसे वळते होतील असे तो भामटा म्हणाला. त्यामुळे त्याने पाठवलेल्या मेसेजवरील 4500 रुपये ट्रान्सफर यावर क्लिक केल्यावर माझे सगळे पैसे खात्यात गेले. पुन्हा पैसे न आल्यामुळे मी त्या भामट्याला कॉल केला, पण त्याने माझा फोन घ्यायचे टाळण्यास सुरुवात केली आणि पैसे परत केले नाही, असे चोरगे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपीचा मोबाईल नंबर सुरू असून त्याने चोरगे यांच्या भावाचेदेखील पैसे त्यांच्या गुगल पे खात्यातून वळते केल्याचे निष्पन्न झाले आहे.
























































