विमानाचे तिकीट काढण्याच्या निमित्ताने ऑनलाईन गंडा, भामट्याने लुटले 2 लाख रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

विमानाचे ऑनलाईन तिकीट रद्द झाल्याची चौकशी करायला गेलेल्या व्यक्तिला भामट्यांनी तब्बल 2 लाख 22 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. विमानाचे रद्द झालेले तिकीट पुन्हा काढतो असे सांगून भामट्यांनी पती-पत्नीच्या खात्यावरील पैसे लंपास केले.

जयद्रथ चक्रवर्ती,(रा. नाचणे, रत्नागिरी) यांना त्यांनी काढलेले जेट एअरवेजचे तिकीट रद्द झाल्याचा संदेश आला होता. त्यानंतर त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फिर्यादीने आपण यात्रा डॉटकॉमवरुन बोलता का असे विचारले, असता समोरून होय असे सांगण्यात आले. त्यानंतर जयद्रथ चक्रवर्ती यांनी त्यांचे विमानाचे तिकीट रद्द झाल्याची माहिती सांगितली. त्या फोनवरून बोलणाऱ्या भामट्याने तुमचे तिकीट पुन्हा आरक्षित करतो, असे सांगून जयद्रथ चक्रवर्ती यांच्या अॅक्सिस बँकेच्या खात्याची आणि एटीएम कार्डची माहिती घेतली. त्यानंतर चक्रवर्ती यांच्या अॅक्सिस बँकेच्या खात्यातून 22,999 रुपयांची रक्कम काढली गेल्याचा मेसेज आला.

त्यानंतर चक्रवर्ती यांनी आलेल्या फोननंबर वर पुन्हा फोन केला. पैसे काढले गेल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने तुमची रक्कम पुन्हा अकाऊंटवर पाठवली जाईल. तक्रारीचे 10 रुपये शुल्क आम्ही पाठवलेल्या लिंकंवर पाठवा असे सांगितले. जयद्रथ चक्रवर्ती यांनी स्टेट बँकेच्या खात्यावरून 10 रुपये पाठवले. त्याचवेळी त्यांच्या त्या खात्यातून 60 हजार रुपये आणि चक्रवर्ती दांपत्याच्या संयुक्त खात्यावरून 1 लाख 29 हजार रुपये इतकी रक्कम काढून घेतली गेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चक्रवर्ती दांपत्याने रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.