
शिक्षण संचालनालयाने 15 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचे जाहीर केले. मात्र शाळा सुरू होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असतानादेखील नवीन वर्ग कसे सुरू करायचे याविषयी कोणत्याही सूचना शाळांना मिळालेल्या नाहीत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने नवीन वर्ग ऑनलाइन भरणार आहेत. पण इयत्तानिहाय ऑनलाइन वर्गांच्या तासिका, नियम याविषयी शाळा, कॉलेजना शिक्षण संचालनालयाचे मार्गदर्शन हवे आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे उशिराने सुरू झालेल्या ऑनलाइन, ऑफलाइन वर्गांमुळे पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमाला कात्री लावावी लागली. यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ऑनलाइन शाळा भरविण्याविषयी शाळांना लवकरात लवकर मार्गदर्शन करावे, अशी मागणी शिक्षक, मुख्याध्यापक करीत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षांची तारीख जाहीर करताना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकार स्तरावरून मार्गदर्शन मिळाल्यानंतर शाळांना सूचना दिल्या जातील, असे म्हटले होते.
शिक्षण विभागाकडून अद्याप सूचना न मिळाल्याने मुंबईतील बहुसंख्य शाळा आणि ज्युनियर कॉलेजनी आपापले नियोजन केले आहे. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाची, शिक्षक आणि विषयांची ओळख करून देण्यावर भर असणार आहे. गेल्या वर्षी 15 जूनला शासन निर्णय काढून शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शाळांविषयी मार्गदर्शन केले होते. इयत्तानिहाय ऑनलाइन शाळांची वेळ किती असेल, यू टय़ूब, टीव्ही चॅनेल आदि शिक्षणाचे माध्यम, विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन याविषयीच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
नियोजन आवश्यक
कोरोनाच्या तिसऱया लाटेत लहान मुलांना होणाऱया प्रादूर्भावाची भीती पाहता ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन करणे गरजेचे आहे व त्यासाठी शाळा, कॉलेजना पुरेशा सूचना दिल्या पाहिजेत, असे ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले. शेवटच्या क्षणी आदेश निघाल्यास मुख्याध्यापकांना निर्णय घेण्यास आणखी विलंब लागतो व विद्यार्थ्यांचे नुकसान होते. काही ठिकाणी शिक्षकांना त्रास होतो. ऑनलाइन शिकवण्याचे स्पष्ट आदेश अद्याप मिळाले नसल्याने सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, असेही आंधळकर यांनी स्पष्ट केले.































































