गर्दी नको, ऑनलाईन शॉपिंगच बरी!

खरेदीत 68 टक्के वाढ झाल्याची मॅकेफीची माहिती कोरोनाच्या धसक्यामुळे बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी अजूनही नागरिकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे असल्याचे पाहायला मिळतेय. मॅकेफी सिक्युरिटी सोल्युशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार, यंदा ऑनलाईन खरेदीत तब्बल 68 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मॅकेफीने या सर्वेक्षणासाठी देशभरातील 18 वर्षांवरील 1 हजार नागरिकांची मत जाणून घेतली होती. 9 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात कोरोनाच्या धसक्यामुळे अजूनही नागरिकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे असल्याचे प्रकर्षाने जाणवले. तीन पैकी एक म्हणजेच 29.5 टक्के हिंदुस्थानींनी आपण आठवडय़ातून 3 ते 5 वेळा ऑनलाईन शॉपिंग करत असल्याचे सांगितले तर 15.7 टक्के नागरिकांनी आपण दररोज काही ना काही ऑनलाईन साईटवरून खरेदी करत असल्याचे सांगितले.

याबाबत मॅकेफीचे मॅनेजिंग डायरेक्टर व्यंकट कृष्णापुर म्हणाले, कोरोनामुळे बाजारातली गर्दी टाळण्यासाठी सुरक्षित पर्याय आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱया भरघोस ऑफर्स यामुळे येत्या काही दिवसांत ऑनलाईन खरेदीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

15 ते 21 ऑक्टोबरला ई कॉमर्स कंपन्यांनी फेस्टिवल सेल आयोजित केला होता. त्यात ऑनलाईन शॉपिंगमध्ये 55 टक्के वाढ आणि 29 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे रेडसीरच्या अहवालात म्हटले आहे.

दिवसाला 375 सायबर हल्ले

ऑनलाईन शॉपिंगसोबत सायबर हल्ल्यांची शक्यतादेखील वाढली आहे. नॅशनल सायबर सिक्युरिटीचे कॉर्डिनेटर रिटायर्ड लेफ्टनंट जनरल राजेश पंत यांच्या माहितीनुसार 2020 मध्ये देशात दिवसाला 375 सायबर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ऑनलाईन फसवणुकीपासून बचावासाठी केवळ 27.5 टक्के लोकांनीच ऑनलाईन सिक्युरिटी सोल्युशनचा वापर केल्याचे मॅकेफीने सांगितले आहे. सायबर गुन्हेगारीबाबत 15.7 टक्के लोक अनभिज्ञ असून 2020 च्या दुसऱया तिमाहीत मिनिटाला 419 थ्रेड आढळल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या