540 पैकी केवळ 72 चालकांनीच केली स्कूलबसची तपासणी; सोलापूर आरटीओ करणार कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहरात व जिह्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱया मोठय़ा वाहनधारकांना गेल्या महिन्यातच विविध तपासण्या करून परवानगी घेण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनेला 540 पैकी केवळ 72 स्कूलबस चालकांनीच प्रतिसाद दिला असून, त्यांची तपासणी आठवडाभरात झाली आहे. उर्वरित वाहनांची तपासणी होणे बाकी आहे. त्यामुळे विद्यार्थी वाहतुकीची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या महिन्यात स्कूल बसचालकांना बोलावून मार्गदर्शन करण्यात आले होते. नियमांचे कडक पालन करावे, असे आवाहनही केले होते. तरीही सजगता आली नाही. गाडय़ांचा वेग, योग्यता प्रमाणपत्र यामध्ये किंवा आणखी काही प्रकारच्या नियमावलीचा भंग केला तर मात्र जबर कारवाई केली जाणार आहे.

सोलापुरात एकूण 540 मोठय़ा स्कूल बसेस आहेत. शाळांच्या विद्यार्थ्यांची ये-जा करणाऱया मोठय़ा वाहनांवर सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नजर ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱया गाडय़ांचे योग्यता प्रमाणपत्र वेळेत घ्या आणि गाडीचा वेग 40 पेक्षा अधिक असू नये, वाहन सहायक ठेवणे, पायऱयाची उंची, ब्रेक इतर सर्व नियमांचे पालन आवश्यक असून, याकरिता तपासणी केली जाणार आहे. त्यात पळवाट काढली तर कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे.

दर दोन वर्षांनी 15 टक्के शुल्कवाढीची मुभा
महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क अधिनियमातील तरतुदीनुसार शाळा व्यवस्थापनाला दर दोन वर्षांनी वार्षिक शुल्कामध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची मुभा आहे. यासाठी शाळा व्यवस्थापनाने पालक, शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीकडे प्रस्ताव सादर केल्यास कार्यकारी समितीकडून शुल्क निश्चिती होईल. त्याची अंमलबजावणी शाळांनी करणे आवश्यक आहे. 15 टक्क्यांपेक्षा जास्तीत जास्त शुल्कवाढ केल्याचे निदर्शनास आल्यास पालक, पालक संघटनेची तक्रार येण्याची वाट न पाहता संबंधित शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालकांनी कारवाई करावी. तसेच, या वर्षात नियमापेक्षा जास्त शुल्कवाढ होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शाळेतील मुलांची ने-आण करणाऱया ज्या स्कूल बस आहेत त्यांनी नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. 40 किमीपेक्षा अधिक वेग आढळल्यास त्याकर कारवाई केली जाईल. सध्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ व्हायला नको याची काळजी प्रशासन नक्कीच घेणार आहे.
– अमरसिंह गवारे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर.