Kolkatta Murder Case – नागपूरमध्ये मेयोच्या निवासी डॉक्टरांचं आंदोलन; रुग्णालयाबाहेरच सुरू केली OPD

नागपूरच्या मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर रुग्णालयातील असुरक्षित परिस्थीतीचा निषेध म्हणून रुग्णालयाबाहेरच ओपीडी सुरू केली. यामध्ये 100 हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला आणि रुग्णालयाबाहेरच एकूण 150 रुग्णांवर उपचारही केले. परिचारिकांनी देखील हातावर काळीपट्टी बांधून या घटनेचा निषेध केला.

‘मेयो’चे ‘मार्ड’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. बालगंगाधर द्विडमुठे यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. श्रेया गुप्ता, डॉ. पूजा सई, डॉ. नयन राजशेखर व डॉ. सामी यांच्या पुढाकारात रुग्णालयाच्या रस्त्यावर गुरुवारी ‘ओपीडी’ सुरू करण्यात आली. यात आंदोलनकर्ते डॉक्टरांनी मेडिसीन, पेडियाट्रिक, सर्जरी व ऑर्थाेपेडिकच्या रुग्णांची तपासणी केली. डॉक्टरांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधले.

‘मेयो रुग्णालयातील काही डॉक्टरांनी आंदोलनावर भाष्य केले. हे आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर का आली याची माहितीही त्यांनी यावेळी केला. ‘आम्ही खरोखर आमच्या रुग्णालयाच्या भींतींमध्ये सुरक्षित आहोत का? जर असे गुन्हे रुग्णालयाच्या आवारातच घडले तर या चार भींतीची गरज काय आहे. डॉक्टरांची सुरक्षा देखील वाऱ्यावर आहे. असे प्रश्न यावेळी डॉ. पूजा साई यांनी उपस्थित केले. तसेच डॉक्टरांनी 25 ऑगस्टपासून एक तास काम बंद ठेवण्याची योजना आखली होती. संचालक डॉ. विकास महात्मे आणि कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी संपावर असलेल्या डॉक्टरांची भेट घेतली. आणि गुरुवारी रात्री हा संप मागे घेतला.