
चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमी, विवोपाठोपाठ आता ओप्पो कंपनीची सीमा शुल्क चोरी उघडकीस आली आहे. डीआरआय अर्थात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या ओप्पो कंपनीच्या चौकशीदरम्यान या कंपनीने सुमारे 4,389 कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडविल्याचे उघडकीस आले आहे. चौकशीअंती, ओप्पोला ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली असून सीमा शुल्क भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच ओप्पो इंडिया कंपनी, तिचे कर्मचारी तसेच ओप्पो चीन या सर्वांना सीमा शुल्क कायदा, 1962 अन्वये दंड ठोठावण्याचा प्रस्तावदेखील ठेवण्यात आला आहे. डीआरआयतर्फे ओप्पो इंडियावर केलेल्या कारवाईदरम्यान मोबाईल फोन्सच्या उत्पादनासाठी आयात केलेल्या काही सामग्रीच्या वर्णनात चुकीचे दावे करण्यात आल्याचे दर्शविणारे पुरावे सापडले आहेत.
























































