आयआयटी ‘टेकफेस्ट’ शालेय विद्यार्थ्यांना रशियाची सफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

पवई येथील आयआयटी मुंबईचा ‘टेकफेस्ट’ महोत्सव हा केवळ मनोरंजन आणि स्पर्धांसाठीच मर्यादित नसतो तर विद्यमान पिढीला उद्याचे संशोधक म्हणून घडवण्यासाठी प्रोत्साहनही देतो. यंदा ‘टेकफेस्ट’च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना रशियाची सफर घडवली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना टेकफेस्टमधील ‘इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा जिंकावी लागणार आहे.

टेकफेस्ट आणि रोसॅटोम संस्थेच्या वतीने ही सफर घडवली जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी टेकफेस्टने सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनच्या (एसओएफ) वतीने इनोव्हेशन चॅलेंज प्रश्नोत्तरे स्पर्धा आयोजित केली आहे. नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थीच या प्रश्नोत्तरे स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत. सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धा गेल्या 1, 15 आणि 27 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती.

इनोव्हेशन चॅलेंजमधून 15 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडले जाणार आहेत. ती टेकफेस्ट महोत्सवात घेतली जाणार आहे. त्यातील विजयी 8 विद्यार्थ्यांना रशियाला नेण्यात येणार आहे. 3 ते 11 जानेवारीदरम्यान तिथे होणाऱ्या रशियन विंटर कॅम्पमध्ये ते विद्यार्थी सहभागी होतील. त्यांचा प्रवास, जेवण, निवास आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था टेकफेस्टकडून विनामूल्य करण्यात येईल. या कॅम्पदरम्यान विद्यार्थ्यांना मॉस्को येथील विविध सायन्स म्युझियम्स पाहता येणार आहेत. याशिवाय इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेतील सात विद्यार्थ्यांना टेकफेस्टच्या वतीने केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरची टूर घडवली जाणार आहे.