पुण्यातील भूखंडाच्या प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ; कामकाज दोनदा तहकूब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पुण्यातील दोन भूखंडांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून आज विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. विधान भवनाच्या पायर्‍यांपासून विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. महसूलमंत्र्यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचारावर बोलण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांना विधानसभा अध्यक्षांनी परवानगी नाकारल्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले.

पुण्यातील हवेली तालुक्यातील मौजे केसनंद येथे म्हतोबा देवस्थानाची जमीन आणि बालेवाडीतील एका जमीनीच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांनी बुधवारी महसूलमंत्र्यांवर पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे कामकाज सुरू होताच एका निवेदनाद्वारे खुलासा केला. या दोन्ही प्रकरणांमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. मी केलेले आरोप कामकाजातून काढून टाकले आहे मग त्यावर चंद्रकांत पाटील निवेदन कसे काय करू शकतात, असा आक्षेप घेत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचे निवेदन कामकाजातून काढून टाका किंवा बुधवारी केलेले निवेदन सभागृहाच्या पटलावर घ्या अशी मागणी केली, पण सभागृहात मुदतीत कागदपत्रे सादर केली नाही त्यामुळे त्यांचे निवेदन पटलावर घेता येणार नाही असे सांगत विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. संसदीय कामकाजमंत्री विनोद तावडे यांनीही विधानसभा नियमातील तरतुदीचा आधार घेत जयंत पाटील यांचे निवेदन पटलावर घेता येणार नाही असे सांगितले.

आवाज का दाबता

यापूर्वीच्या नोंदी तपासा, विरोधी पक्षनेत्यांनी आरोप करताना नोटीस दिलेली नव्हती. कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असताना आमचा आवाज का दाबता, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी केला.

तर जनहित याचिका

भूखंड घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे मी सभागृहात देतो, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी नाही तर याप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.