
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील भाजपचे सरकार हे आभासी, निष्क्रिय, भ्रष्टाचारी, शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी आज मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याची घोषणा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्य मंत्रिमंडळातून केवळ सहा मंत्र्यांना नव्हे तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या भाजपच्या दीड डझन मंत्र्यांना वगळण्याची मागणी या वेळी विरोधकांनी केली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी-4 शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख, शेकापचे नेते जयंत पाटील, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे आदी उपस्थित होते.
मेहतांच्या विरोधात एफआरआय करा
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारमधून भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे सहा मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. केवळ सहा मंत्र्यांना वगळून चालणार नाही तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दीड डझन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवे. प्रकाश महेतांसारख्या बाराशे कोटी रुपयांच्या एफएसआय घोटाळा केलेल्या मंत्र्यांना केवळ वगळून चालणार नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली.
हेक्टरी 25 हजारांची मदत
राज्यात दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन शेतकर्यांना पेरणी व पूर्वमशागतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्यात यावी, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतकर्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आल्याने बेरोजगार तरुणांना भत्ता दिला पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली.
दहावीच्या परीक्षेतील गोंधळ
राज्य शिक्षण मंडळाने यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा गोंधळ घातला आहे. त्यामुळे गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. हा विषय सभागृहात उपस्थित करून राज्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते
विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारे पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांना देणार असल्याचे अजित पवार यांनी या वेळी जाहीर केले.


























































