शेतकऱयांच्या मदतीचा मुद्दा अधिवेशनात लावून धरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Devendra fadanvis chief minister maharashtra

राज्यातील शेतकऱयांना अजून मदत मिळालेली नाही, वाढीव वीज बिलांमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. सरकारने अधिवेशनापासून कितीही पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी शेतकऱयांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा विषय आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात लावून धरणार, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील रणनीती आखण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक गरवारे क्लबमध्ये आयोजित केली होती. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे नेते ऍड. आशीष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. शेतकरी मदत, शक्ती कायदा, वीज बिलांची वाढीव रक्कम, पूजा चव्हाण आत्महत्या, अधिवेशनाचा अपुरा कालावधी असल्याच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी पक्षावर टीका केली.

तथाकथित अधिवेशनाचा उल्लेख 

सोमवारपासून सुरू होणाऱया अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उल्लेख तथाकथित अधिवेशन असा करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या इतिहासातील सर्वात लहान व पूर्णपणे कामकाजापासून पळ काढणारे अधिवेशन आहे. म्हणून त्याचा उल्लेख तथाकथित अधिवेशन म्हणून केल्याचे ते म्हणाले. कोणत्या विषयावर चर्चा होऊ नये म्हणून अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकऱयांना मदत नाही

शेतकऱयांच्या मदतीच्या मुद्दय़ावरूनही त्यांनी टीका केली. शेतकऱयांच्या मदतीचा विषय आम्ही अधिवेशनात लावून धरणार आहोत. शेतकऱयांना मदत दिली जाईल असे आश्वासन बांधावर जाऊन देण्यात आले, पण अजूनपर्यंत शेतकऱयांना कोणतीही मदत मिळालेली नाही असा दावा त्यांनी केला. शेतमालाची खरेदी सरकारने केलेली नाही. सर्वसामान्य माणसांवर वाढीव विजेची बिले लादली आहेत. शेतकरी व सामान्य माणसावरही संकट आहे, असे ते म्हणाले.

शक्ती कायदा समितीतून बाहेर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शक्ती कायदा हा फार्स आहे. कायदे करून काही होणार नाही. कारण हे कायदे सत्ताधारी पक्षाला लागू होत नाही. शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामा देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पत्रकार परिषद एकाच मुद्दय़ावर

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधकांच्या पत्रकार परिषदेकडे सत्ताधारी पक्षासह राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले असते, पण आजच्या पत्रकार परिषदेत विरोधकांकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या पलीकडे कोणतेच मुद्दे नव्हते. संपूर्ण पत्रकार परिषद एकाच मुद्दय़ाभोवती फिरत राहिली.