
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पश्चिम बंगालमधील प्रचार एक दिवस आधीच गुंडाळावा लागल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रचारबंदीविरुद्ध सर्व विरोधक एकवटले असून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये दोन प्रचारसभा घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केला तर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली.
मंगळवारी कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोवेळी मोठा हिंसाचार भडकला होता. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी लाठय़ा फेकल्या, दगडफेक केली. त्यानंतर भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते भिडले. यावेळी जाळपोळ झाली. धुमश्चक्रीत महान समाजसुधारक, विचारवंत ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली. या हिंसाचाराची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने कलम 324 चा वापर केला.
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी आहे. याचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे, मात्र पश्चिम बंगालमधील नऊ मतदारसंघांतील प्रचार 19 तास आधीच गुरुवारी समाप्त करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. त्यानुसार काल प्रचार संपला. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वृत्तवाहिन्यांद्वारे प्रचार करण्यासही आयोगाने बंदी घातली आहे. त्यानंतर काल दिवसभर आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. यानिमित्ताने विरोधक एकवटले होते.
मोदी आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर तुरुंगात धाडेन!
मथुरापूर : ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडल्याचा आरोप नरेंद्र मोदी करत आहेत पण ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर 100 उठाबशा काढतील का ? त्यांनी उठाबशा काढल्या नाहीत तर त्यांना तुरुंगात धाडेन अशी धमकीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. मोदी सातत्याने खोटे बोलत असल्याचा आरोपही ममता यांनी केला आहे. ते 200 वर्षे जुना जागतिक वारसास्थळाचा दर्जा लाभलेला पुतळा परत करू शकतात का? आमच्याकडे पुरावा आहे आणि तुम्ही म्हणता पुतळा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तोडला. त्याबद्दल तुम्हाला लाज नाही वाटत का, असा सवाल करतानाच मोदी आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांना तुरुंगात धाडेन अशी धमकीच देऊन टाकली. मथुरापूर येथील एका प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
तृणमूल काँग्रेसमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात
देशभरात सर्व राज्यांत निवडणूक शांततेत पार पडत असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र प्रत्येक टप्प्यात काही ना काही हिंसात्मक घटना घडत आहे. तृणमूल काँग्रेसमुळे या ठिकाणची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचा आरोप भाजप नेते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या गुंडागर्दीबाबत भाजपने गुरुवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे गुंड असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. निवडणूक आचारसंहितेचा हा भंग आहे. मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेले हे प्रकार थांबविण्यात यावेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले.
कोण काय म्हणाले
निवडणूक आयोगाचा निर्णय हा देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. निवडणूक आयोग पक्षपाती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आचारसंहिता भंगच्या 11 तक्रारी केल्या पण आयोगाने क्लीन चिट दिली. ‘नमो टीव्ही’वरही बंदी घातली नाही. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई का केली जात नाही?
रणदीप सुरजेवाला (प्रवक्ते काँग्रेस)
निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करीत आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली खुल्या आणि निष्पक्ष वातावणात निवडणुका झाल्या नाहीत हे स्पष्ट होते. प्रचारबंदी करायची होती तर सकाळपासूनच करायला हवी होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडून ममता बॅनर्जींची कट आखून बदनामी केली जात आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्तीला हे शोभत नाही.
मायावती (अध्यक्ष, बसपा)
निवडणूक आयोगाचा निर्णय हा लोकशाहीतील सर्व संकेतांविरुद्ध आहे. माझा पूर्ण पाठिंबा ममतादीदींना आहे. ज्या व्यक्तींनी देशातील प्रत्येक घटनात्मक संस्थांचा अपमान केला त्याविरुद्ध ममतादीदी लढत आहेत.
अखिलेश यादव (अध्यक्ष, सपा)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून केलेल्या तक्रारींची आयोगाकडून दखल घेतली जात नाही. निवडणूक आयोग बहिरे बनले आहे. पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली जाते, भाजपच्या खोटय़ा तक्रारींवर तत्काळ कारवाई केली जाते. यावरून निवडणूक आयोगाच्या निष्पक्ष कारभारावर शंका आहे.
चंद्राबाबू नायडू (अध्यक्ष, तेलगू देसम)

























































